श्री सदगुरु स्वामी आडकुजी !
(चाल: पतीतपावन नाम ऐकुनी..)
श्री सदगुरु स्वामी आडकुजी ! माया अति घोर ।
शरण तुला रे ! आलो धावत,करि मज- भव-पार ॥धृ०।।
कामक्रोध मदमत्सर हे तो फार मला छळिती ।
पुनरपि जन्मुनि पुनरपि मरणे, आर्त दारुण पिडती ।
मतति-संपत्ति मायिक सगळी, गमे गोड फार ।।
शरण तुला रे ! ।।१।।
मायबाप गणगोत नको हे आडकुजी देवा ।
कृपाकटाक्षे जाळुनि टाकी सर्वचि ह्या मावा ।
पुरेपुरे हा सुखदुःखांचा डोंगर गुरूराया !
धाव धाव रे ! वरखेडीच्या मुकुटमणी सखया !
दावी मजला सदगुरुराया ! निर्मळ सुख- सार ।।
शरण तुला रे ! ।।२॥
बहु दिनवाणी तुकड्यादासा नसे कुठे थारा ।
अपुले चरणी लावी मन हे, काटुनि भ्रम सारा ।
चौऱ्यांशीचा फेरा न लगे, बहू मी श्रमी झालो ।
नका दावु हो ! असली माया, बुध्दिहीन बनलो ।
तुकडयादास म्हणे गुरुराया ! ब्रीद तुझे थोर ।।
शरण तुला रे ! ॥३॥