इकडे तिकडे अथांग पाणी, पडलो मी काठी
(चालः कसा निभवसी काळ..)
इकडे तिकडे अथांग पाणी, पडलो मी काठी I
काहि सुचेना, कृपा करी रे ! आलो यासाठी ॥धृ०॥
मायबाप गणगोत नको मज, त्रासी मी झालो ।
चंचल मन हे फिरते माझे, पाहुनि घाबरलो ॥१॥
एकिकडे हो ! प्रपंच लहरा उठती जोराने ।
प्रेमझरा तो चाले झुळझुळ आत्मज्ञानाने ॥२॥
नको बलाढ्यहि प्रपंच- लहरा, किति उठती-बुडती ।
तुकड्यादासा काढूनि त्राता ! ने गा निजगृहती ॥३॥