वस्त्र पुरविसी तू द्रोपदिसी, मी बाळ तुझा का नावडता ?

(चाल : राधा गौळण करिते मंथन..)
वस्त्र पुरविसी तू द्रोपदिसी, मी बाळ तुझा का नावडता ? ॥धृ०॥
पाच वरुषाचे ध्रुवबाळ तान्हे । अढळपदी दिधले त्या ठाणे ।
पाताळि नेला बळि पायाने । घेसि    धाव    प्रल्हादाकरिता    ॥१॥
मायबाप गणगोत-जिव्हाळा । आणिक इष्टमित्र गण-मेळा I
तुजविण घेई कोण कळवळा ? तारी बाळ   तुझे  जगत्राता ! ।।२॥
त्वरित शिळा चरणे उध्दरसी । चोख्याची बहू ढ़ोरे ओढिसि ।
अर्जुनाचि रणि जीत करविसी । आण गळ्याची, वद गुज आता ॥३॥
काम- क्रोध मद-मत्सर वैरी। गांजिति हे प्रभु ! मला बहुपरी ।
सोसवे न बा ! जाच   श्रीहरी ! धाव    दयाळा   लक्ष्मीकांता ! ॥४॥
पहसि अत किती आडकोजी ! त्वरित प्रेम-पान्हा मज पाजी I
दास-फजीति उचित का तुजसी ?तुकड्यादास पदरि घे नाथा ॥५॥