करि कृपा सदगुरुराया ! अजब ही माया
(चाल: गर्भिणी होती एक हरणी..)
करि कृपा सदगुरुराया ! अजब ही माया ,त्रास सोसेना ।
बहु झाल्या यम - यातना ।।धृ०।।
तोड़ी जन्ममरण-आस हो !
ने निजधामी सावकाश हो !
पावन तू त्रैलोक्यास हो !
बा! ये आडकुजी गुरु ! किती तुज स्मरु ? नये का पान्हा ?
हा काम क्रोध मज अजुनीही आवरेना ॥१॥
नउ मास उदरी राहिलो ।
बहु तेथे कष्टी झालो ।
संचिते पारहि निघालो ।
घडी-घडी-पल वय हे जाते,धाव गे माते ! येउ दे स्मरणा ।
बा! अंतकाळि यम दया न दावो कोणा ।।२॥
जग तारायासी आले ।
ब्रीद पाहि पाहि अपुले ।
ना पाहता वाया गेले I
बा ! गेली वर्षे सत्रा, जीव घाबरा, त्यजू का प्राणा ?
हरि-चरणि ठाव तो अता तरि हो ! द्याना।।३॥
भवी तुकड्या पावतो व्यथा।
ये वरखेडीच्या नाथा !
लावि नाम-स्मरण-पंथा ।
बाळ हा पातकी जरी, आडकुजी हरी ! पुरवि कामना ।
तुकड्या म्हणे वरदहस्त तरी ठेवाना ॥४॥