करि करुणा श्रीगुरुनाथा ! दीनांचा त्राता
(चाल: गर्भिणी होती एक हरणी..)
करि करुणा श्रीगुरुनाथा ! दीनांचा त्राता, भक्त-कैवारी !
कोण सांग संकट वारी ।।धृ०॥
लक्ष चौर्यांशीचे फेरे ।
फिरलो बहु मोह-विकारे ।
फिरता हा जीव घाबरे ।
हीन दीन होई भारी । कोण सांग संकट वारी ? ॥१॥
सुखदुःखे भोगी नाना ।
गर्भीहि स्थीर राहेना ।
कासाविस होई प्राणा ।
पडे अकस्मात बाहेरी । कोण सांग संकट वारी ? ॥२॥
पडताचि बाहेरी मरे ।
पुन्हा योनिद्वारे संचरे ।
ऐसे अनंत कोटी फेरे ।
त्रास गा परोपरि भारी । कोण सांग संकट वारी ? ॥३॥
मज काहि नाठवे चित्ती ।
फिरे विषयसंगती वृत्ती ।
क्षणिक सुखे होय फजीती ।
वज्र गा ! पडे मजवरी। कोण सांग. संकट वारी ? ॥४॥
भव - पाश महावेष्टण ।
तेथे बहुत तम दारुण ।
कोण सोडविल त्यातून ?
जिव भुले सृष्टिमाझारी। कोण सांग संकट वारी ? ॥५॥
ऐसा अज्ञानी मी बुडालो ।
बहु आक्रंदू लागलो ।
गुरुकृपे पार जाहलो ।
पुढे तुकड्याचा हितकारी । कोण सांग संकट वारी ? ॥६॥