सुखासनी बैसुनी दयाळा ! का गंमत पाहसी ?

(चाल: धन्य धन्य गे स्फूर्ति..)
सुखासनी बैसुनी दयाळा ! का गंमत पाहसी ?
ब्रिदावर शून्य कसे घालसी ? ॥ धृ०॥
त्या मातेने नउ महिने हो ! उदरी मज वाहिले।
कष्टही नानापरि साहिले ।।
सोहंमंत्रचि गर्भवासि मज दिला तुम्ही येउनी ।
अता का निष्ठुर बनले मनी ?
अरे ! तुझ्या कृपेने नरदेही पातलो ।
बा ! चौर्यांशीतुनि काय पुण्य लाधलो ?
मम काय भाग्य हे, दारिद्रीच जन्मलो ।
करी करी रे ! कृपा अता तरि त्रासलो मी मानसी ।
ब्रिदावर शून्य कसे चालसी ? ॥१॥
नको मला हा प्रपंच, दिसतो तापांचा डोंगर ।
की उडती झाडी जसे वानर ।॥
नाहि मोकळा, सदा बांधला वाण्याचा बैल हा ।
प्राण कधि वाटे जाईल हा ॥
सोडवी यातुनी मजला आता राया ।
सद्गुरु कृपाळू तू रे ! तोडुनि माया ।
आपुल्या कृपेने लावी तव व्यवसाया ।
धन्य धन्य ते खरे गुरु हो ! भक्ता पाळति निशी ।
ब्रिदावर शून्य कसे चालसी ? ॥२॥
लावुनि नामी कितीक पापी रक्षियले अग्नित ।
कळेना तव महिमा अगणित ॥
मीच दरिद्री तुला कठिण का ? धाव धाव सत्वर ।
ठेवितो श्रीगुरु ! चरणी शिर ।
हा आनंदाचा दिवस, नसे दूसरा ।
आजची येउनी स्वामी ! करुणा करा ।
ना तरी प्राण हा झालासे घाबरा ।
मुयास आस ही लावी ब्रह्मरुप भाससी
ब्रिदावर शून्य कसे  चालसी ? ॥३॥