श्रीहरी कृपा मज करी, पीडलो भारी या
(चालः भटकला कितिक भटकसी..)
श्रीहरी कृपा मज करी, पीडलो भारी या भव-पाशे ।
की होईल कशि मम गती ? कळेना जैसे ॥धृ॥
पंथ ते द्वैति पाहूनी, त्रासलो मनी, धाव रघुनाथा !
ऐकोनि बोध संतांचा वाढली व्यथा।।
वद काय साधने करु ?
हरि ! कैसे तुजला स्मरु ?
बा ! जेणे होईल पारु ।
द्वैत मज भासे ।। की होईल ॥१॥
ऐक्यता घडे ना त्राता ! लावि रे ! पंथा नाम-स्मरणे ।
का दूर लोटते आई बाळ ते तान्हे ?
जाऊ मी कुठे वनवासी ?
त्यागुकी प्राण चरणासी ?
जरि बुडती सारे वंशी ।
न ठेवी आशे ।। की होईल ॥२॥
हे प्रपंच जगडंबर,फिर भरभर, (घरी ना धीर) काय मी मागू ?
संतसंग द्यावा सदा, सत्य हे सांगू ।।
हा नको मला जग ताप, होत बहु पाप प्रपंचा माजी ।
म्हणतसे ईश्वरा ! गुरु-प्रेम मज पाजी ।।
तो अजामेळ तारिला ।
तो तुका स्वगृही नेला ।
वाल्मिका पंथ दाविला ।
द्रौपदी हरुषे ॥ की होईल ॥३॥
मागणे तुला हे हरी ! पाप संहरी, अंध मी झालो ।
श्रीसद्गुरु आडकुजीची कृपा लाधलो ॥
तुकड्यास ठाव दे असा,सद्गुरुनाथा ! लावि रे कासे ।
अपुल्या भजनाचे मला जडू दे पिसे।।
आवडे न साधन मला।
नर जो गुरु-चरणी गेला ।
तो देहि विदेही झाला ।
अद्वैति भासे ।। की होईल 0 ॥४॥