सर्व सुख जेथे पावती जीवाचे ।
(चालः मूर्तरुप जेथे सख्या श्रीपतीचे..)
सर्व सुख जेथे पावती जीवाचे ।
ऐसे ध्यान माझ्या मनी श्रीगुरुचे ॥धृ०।।
भोगासि भोगीता सुखी कोण झाला ?
ऐसा प्रश्न कोणी करा ज्ञानियाला ?
मिळेल उत्तर एकचि सर्वांचे ।
भोगी सुख नाही, कधी जीवनाचे ।।१।।
मग कासयासी करा यातायाती ?
सर्व करुनिया जीवनाची माती।।
ऐसे न घेइ मना ऐकुनी कुणाचे।
सार्थक करावे वाटे जरी साचे ॥२॥
अंतरी निर्मळ, व्यवहारी प्रांजळ।
सदा सर्वकाळ ,सेवेची तळमळ ।।
तुकड्यादास म्हणे, सार्थक आमुचे ।
हेची समाधान लाभो शेवटीचे ॥३॥