कितीदा करु प्रार्थना ?
( चाल : चंदा जा चंदा जा रे जा . . )
कितीदा करु प्रार्थना ? कितीदा करू प्रार्थना ?
मन पळे रानोरानी आवरेना साधनांनी ,
म्हणुनि ही आराधना ॥धृ०॥
जिवनाचे क्षण फुकटचि जावे ।
मग अंती कोणास बघावे ?
निराश्रितापरि व्यर्थ मरावे ।
ब्रीद तुझे हे का समजावे ?
कोण चुकवी यम-यातना ? आलो तव चरणा ॥१॥
दोष अम्हावर का मग द्यावा ?
अज्ञ जीव फिरुनीहि म्हणावा ?
तुझ्या कृपेचा वरद नसावा ।
कोणा कुणी हा न्याय म्हणावा ?
चुकले तरी चुकेना , आलो तव चरणा ॥२॥
भवदुःखाचा पाश नको हा ।
जड देहाचा ध्यास नको हा ।।
मन विषयाचा दास नको हा ।
आयुष्याचा नाश नको हा ।।
दास तुकड्याची याचना , घ्याना करुणाघना ! ॥३॥