( चाल : वाढो सदा यशाला हा हिंद देश . . ) 
राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली । 
ती सर्व प्राप्त झाली , या झोपडीत माझ्या ॥धृ॥ 
महाली मऊ बिछाने , कंदील शामदाने । 
आम्हा जमीन माने , या झोपडीत माझ्या ॥१॥ 
भुमीवरी पडावे , ताऱ्यांकडे पहावे । 
प्रभुनाम नित्य गावे , या झोपडीत माझ्या ।।२।। 
स्वामीत्व तेथ त्याचे , तैसेचि येथ माझे । 
माझा हुकूम गाजे , या झोपडीत   माझ्या ।।३।। 
महालापुढे शिपायी , शस्त्री सुसज्ज राही । 
दरकार तीहि नाही , या झोपडीत  माझ्या ।।४।। 
जाता तया महाला , मत जाव शब्द आला । 
भीती न यावयाला , या झोपडीत  माझ्या ।।५।। 
महालात चोर गेले , चोरूनि द्रव्य नेले । 
ऐसे कधी न झाले , या झोपडीत    माझ्या ॥६॥ 
पहारे आणि तिजोऱ्या , त्यातुनि होति चोऱ्या । 
दारास नाहि दोऱ्या , या झोपडीत   माझ्या ॥७॥ 
महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही । 
झोपेत रात्र जाई , या   झोपडीत    माझ्या ॥८॥ 
येता तरी सुखे या , जाता तरी सुखे जा । 
कोणावरी न बोझा , या झोपडीत  माझ्या ॥९॥ 
चित्तात अन्य रामा , शब्दी उदंड प्रेमा । 
येती कधी न कामा , या झोपडीत माझ्या ॥१०॥ 
पाहोनि सौख्य माझे , देवेंद्र तोहि लाजे । 
शांती सदा विराजे , या झोपडीत माझ्या ॥११॥
वाडे , महाल , राणे , केले अनंत ज्याने । 
तो राहतो सुखाने , या झोपडीत माझ्या ।।१२।। 
तुकड्या  मती स्फुरावी , पायी तुझ्या रमावी । 
मूर्ती तुझी रहावी , या झोपडीत  माझ्या ॥१३।।