वर्णू या गुण थोडे मम हो, झोपडिचे आता ।
(चालः कसा निभवसी काळ..)
वर्णू या गुण थोडे मम हो, झोपडिचे आता ।
रात्रंदिन निज-आवाज ऐकू, चक्रीचा त्राता ! ।।धृ०।।
खडखड धडधड अनाहती तो, नादचि घुमघुमतो ।
मज वाटे की मृदंग वीणा, टाळ सुरु होतो ।।१।।
क्षणिक सुखाचे ब्याँड नगारे, उठोनिया जाती ।
अगणित हो आवाज ऐकण्या, नच धजते छाती ॥२॥
दुमदुमिले मम सदन अता हे, मंजुळ नादाने ।
कोणि नसे या पुढे सुरादिक, कौशल्ये जाणे ॥३॥
तुकड्यादास सांगतसे, निज-हित रे ! मम सदनी ।
देउनियाही कनक कुणाला, सुख मिळे न जनी ।।४॥