जाउ चला सदगुरुनाथाचे, दर्शन करुनी येउ घरा

(चालः अपने आतम के चिंतनमें...)
जाउ चला सदगुरुनाथाचे, दर्शन करुनी येउ  घरा ॥धृ०॥
नेत्र उदासी रुप अविनाशी, ब्रह्म - पदासी पाहि बरा ।
सुहास्य वदने जाळी मदना, नेइल मज भवपार खरा ।।१।।
मुक्ति-विधाता तो जगत्राता, जनिता, माता, बंधु खरा ।
कृपा - दृष्टिने पाही दीना, देइल पद   अविनाशि  बरा ।।२॥
प्रेमळ गीता स्मरणी गाता, देइल मज सु- प्रेम- झरा ।
त्याविण नाही सुख हे सखया ! तोचि धरिल पद-पद्मि बरा ।।३॥
आणिक नलगे साधन काही, सद्गुरु - रुप ते ध्यानि धरा ।
तुकड्यादासा करि करुणा मग,चिन्मय मुख ते पाहि बरा ।।४।।