आनंद मला वाटे हो ! पाहुनिया तुमचे पाय

(चाल: ऐकता स्वस्थ तरि काय..)
आनंद मला वाटे हो ! पाहुनिया तुमचे पाय ।।धृ0।।
दुमदुमले नगरचि सारे, की स्वर्ग उतरला काय ।
वाटते मनाला ऐसे, तू उध्दरिसी गे माय !
वर्णु काय कीर्ती आता ?
नेति  वेद बोले त्राता !
का इथे चले मम सत्ता ?
मम भाग्यचि उदया आले, पाहिले श्रीगुरुराय ।।१॥
धन्य-धन्य सद्गुरुराया ! सोडवी त्वरित रे माया ॥
बहु बुडलो या व्यवसाया | धरु किती धीर रघुराया !
कनवाळू माझे   आई !
श्री सदगुरू जगदंबाई !
तू भक्त वत्सले    माई !
देह ही तुच्छ हा वाटे, तुज पाहुनि घेत बलाय ॥२॥
तन-मन-धन तल्लिन झाले,जगताला विसरुनि गेले ।
पाहूनि गाय सुखदायी, तान्हुल्यापरी हुंबरले ।।
तुकड्यास ठाव गे ! देई ।
श्रीसदगुरु कृष्णाबाई !
तुजविना दुजे मज नाही ।
भवसिंधु तराया सोपा, तुज ऐसा नाहि उपाय ।।३।।