दिसतो हरी हा भोळा, परि त्रिभुवनि याचा डोळा

(चाल: रमला कुठे ग कान्हा..)
दिसतो हरी हा भोळा, परि त्रिभुवनि याचा डोळा ॥धृ०।।
लावितो खेळ खेळाया, सोडुनिया अपुली माया l
आपणची राहि निराळा ।। परि त्रिभुवनि 0 ।|१।।
वनि चारत राही गाई, परि गोपींचे मन मोही ।
रमवितो  वनी  गोपाळा।। परि त्रिभुवनि० ।।२।।
द्रौपदिला वस्त्रे देई,आपण यमुनेतिरि राही ।
ना कळतो याचा  चाळा ।। परि त्रिभुवनि0 ।।३।।
मन वेधुनि ने भक्तांचे, कुणि म्हणता हरि हरि वाचे ।
नेउ न दे   अंती   काळा ॥ परि त्रिभुवनि0 ।।४।।
तुकड्याची तोडुनि माया, प्रभु देइल सुख जिवा या ।
वाहू ही आस - सुमाळा ।। परि त्रिभुवनि 0 ।।५।।