गमला मला हरि आला, आलासे भारतभूला
(चाल: रमला कुठे ग कान्हा..)
गमला मला हरि आला, आलासे भारतभूला ।।धृ०॥
नववृत्ती तरुणा आली, देशाची चिंता पडली ।
देताती प्राण पणाला ।। आला0।।१।।
फिरती नेत्यांच्या झुंडी, वाजविली राष्ट्री कंडी ।
आली, देशाची चिंता पडली ।
जागा हा हिंदू झाला ।। आला 0 ।।२।।
जातीपाती दुर झाल्या, संघटनेकरिता जमल्या ।
वाटे सुदिन उदेला ।। आला0 ॥३।।
नवरक्त उसळले लोकी, गर्जविती जन हे हाकी ।
मिळवू या निज हक्काला।।आला 0।|४।।
अति दुर्बलता ही गेली, निर्भय वृत्ती सरसरली ।
कर लागला विजयाला।। आला0।।५।।
तुकड्या म्हणे वाढो एकी, जनता होउनि निःशंकी ।
प्रभु देवो आत्मबलाला ।। आला0।।६।।