ऐका हाक भारताची, सांगा संत महंतासी
(चालः राधे ! इतुका कशाला..)
ऐका हाक भारताची, सांगा संत महंतासी ॥धृ०।।
भारतभूचे चालक तुम्ही, ईशाचे आवडते प्रेमी ।
मारा हाक लाडक्यासी ।। सांगा0 ।।१।l
धर्म लयाला गेला सगळा, टपला लूट कराया बगळा ।
याची लाज ही कुणासी ? ॥ सांगा0 ॥२।।
ध्यान कराया जागा नुरली, ईश-मंदिरे स्मशान झाली ।
गेले हक्क हे दुजासी ।। सांगा0 ।।३।।
सोडा धुनी-धतुरे आता, घ्यावे चिमटे अपुले हाता।
दावा आपुल्या बळासी ।। सांगा 0॥४॥
स्फूर्ति द्यावि तरुणाच्या अंगा,चढवा त्या वीरांच्या रंगा।
भाळी लाभवा जयासी ।। सांगा0 ।।५।।
दरी, कंदरी, पर्वत-खोरी, असतिल कोणी वायु-विहारी ।
द्यावे वरद हे अम्हासी ॥ सांगा0 ।।६।।
सोडा अपुली मुग्ध समाधी, पुत्रांना सुखवाया आधी ।
सारा दूर या खळासी ।। सांगा 0 ।।७।।
तुकड्यादास म्हणे पामर मी,दुःखे ओरडलो झरझर मी ।
द्यावी क्षमा बालकासी । सांगा 0।।८।।