सोडा आळसा विकारा, जागे होउनी विचारा

(चाल: राधे ! इतुका कशाला..)
सोडा आळसा विकारा, जागे होउनी विचारा ।।धृ०।।
आळस ज्याच्या अंतरि राहे,जाइल त्याचे काम लया हे ।
नेती चोर द्रव्य - दारा ।। जागे होउनी 0 ।।१।।
भारतभूची हीच दुर्दशा, पाठि लागली झोप-उर्वशा ।
झाला फोल देश सारा ।। जागे होउनी० ।।२।।
तरुण गमे वृध्दांच्या वाटे, चढले दुर्बलतेचे काटे ।
झाला तोडिचा पसारा।। जागे होउनी 0 ।|३।।
वीरवृत्तिचा लेश न पावे, मान-प्रतिष्ठे, सगळे धावे ।
शिरला अंगि विषय-वारा।। जागे होउनी ।।४।।
आर्यपुत्र जरि जागे झाले, हक्क घेति खात्रीने अपुले ।
खेळे   मुळिचा  दरारा ।। जागे होउनी0 ।।५।।
तुकड्यादास म्हणे तरुणांसी, झोप कशी आली हृदयासी ?
त्यागा काळ-दुर्विचारा ।। जागे होउनी 0 ।।६l।