दावी स्वरूप आता, का वेळ रामराया !
(चालः राजास जी महाली..)
दावी स्वरूप आता, का वेळ रामराया !
अनिवार सर्व ओढी ही काम - क्रोध - माया ।।धृ०।।
तारोनि ध्रुवबाळा, तोडोनि मायाजाळा ।
बसवी स्थळास अढळा, का केलि सांग छाया ? ॥१॥
प्रल्हाद बाळ साचा, सुत होय कश्यपूचा।
का करिसि मान त्याचा ? तो दैत्य मारवाया ।।२।।
भक्तात श्रेष्ठ झाला वाणी तुका निवाला।
वाल्मिक तारियेला, गुण - कीर्ति वाढवाया ॥३॥
अगणीत भक्त तूझे, हरि ! धाव, येई काजे I
उचली प्रपंच - ओझे , तुकड्यास ठाव द्याया ॥४॥