तार अता येउनिया श्रीधरा ! मला ।

(चालः भाललोचना रे गड्या..)
तार अता येउनिया श्रीधरा ! मला ।
तुजवाचुनि कोण दुजा दावि ही कला ? ॥धृ०।।
जग-पाशे त्रासुनिया शरण लाधलो।
काढि अता यातुनिया, बहुत    विकळलो ।|१।।
काम-क्रोध लोभ- दंभ अडविती कसे ।
प्रेम साधकास    बहू    लाविते     पिसे   ॥२॥
काय करु ? न सुचे मार्ग हरि-हरा ! तुझा ।
लाविसी तू भक्त - काजि संकटी   ध्वजा ॥३।।
मायबाप गांजिती, न जाउ दे कुठे ।
वाटे मज येउ कि  गा !  तू    उभा    विटे ॥४।।
कर्महीन जातिचा मी जन्मलो कसा ?
अजुनिया न   उमटे    वैराग्य   तो   ठसा ।।५॥
पथ पाहता घुमतो, अंत काहि ना ।
सागरी की पर्वति तू ? ना     कळे   मना ।।६।।
कोणि सांगती हरि तो हृदयि राहतो ।
कोणि सांगती   हरि   तो   संत   पाहतो ।।७।।
करु मी काय गा सखया ! साधने अता ?
दास तुकड्या हा भुकेला, उचलि तत्त्वता ॥८॥