शांति न देई संसाराची कधी जिवा चाकरी ।

(चालः पटापतटाला फोड़न आलिस..)
शांति न देई संसाराची कधी जिवा चाकरी ।
तुला हे सांगावे का   हरी ! ।।धृ०।।
तुजवाचुनि नाही जगी खरा आसरा ।
का वाऱ्यावर सोडसी अम्हा वासरा ?
तो क्रूर भयंकर काळ लावि कासरा ।
अखंड देई अपुल्या चरणी थारा मज सत्वरी ।
तुला हे सांगावे  का   हरी ! ॥१।।
या सकल जगाचा विनाश दिसता खरा ।
तुज भ्रमवावे वाटते काय लेकरा ?
मग आम्हीच चुकतो पुन्हा बोलसी बरा ।
तुकड्यादासा नको अता हे दूरदूरपण तरी ।
तुला हे   सांगावे   का   हरी ।।२।।