अंतरलो तव पाय हरी रे ! मी गर्भापासुनी
(चाल: धन्य सद्गुरु ! वैभव तुमचे...)
अंतरलो तव पाय हरी रे ! मी गर्भापासुनी ।
असा का निष्ठुर होसी मनी ? ।।धृ०।।
अज्ञ जरी का बाळ, असे तरि दयाळ तू श्रीहरी !
करी गा ! कृपा दीनाचे वरी ।।१॥
करुनिया उपदेश मंत्र मज दिधला गर्भातरी ।
अता का विसरलास अंतरी ! ।।२।l
अपराधी मी पामर तुमचा अज्ञानी बांधलो ।
कृपेने आज चरण लाधलो ।।३।I
तुकड्यादास उदास असे हा दीनदयाळा ! जनी ।
म्हणुनिया भक्त पाळि धावुनी ।।४॥