राहुनि यमुनातिरी विठोबा ! का गंमत बघसी ऐसी ?
(चाल : तेचि खरे हो अनुभय योगी..)
राहुनि यमुनातिरी विठोबा ! का गंमत बघसी ऐसी ?
आलो मीच जिवावर तुझिया, धावुनि मजला दे फासी ।।धृo॥
भानुदास, नरहरी आणि त्या तारुनि नेशी नामासी ।
असे द्वैत का तुजपासी बा ? उचित असे का हे तुजसी ?।।१।।
तुला मागणे काहि नसे हरि ! देई जोड मज पायाची ।
बहु त्रासलो या व्यवहारी, दया नये का दासाची ? ॥२॥
धन-संपत्ती नलगे काही, वास सदा दे पायाशी I
माया ही आवरी दयाळा ! दे भक्ती गुण गायासी ।।३॥
आण तुला बा ! माझे गळ्याची, दे भेटी मजला त्राता !
अंत पाहसी किती हरी रे ! तुकड्या हा बुडतो आता ॥४॥