करुणाकर , हरि ! तारक तू गा जगदीशा !

(चाल: कर्मनदीच्या धोपट मार्गी..)
करुणाकर , हरि ! तारक तू गा जगदीशा ! ये धावत रे ! I
खचित तुझा हा दास बुडाला, भवसिंधु करि पार त्वरे ॥ धृ०॥
गर्व बहू मम हृदयी राहे, कार्य सुचेना सार बरे I
घननिळ तू जगताचा पालक, धरिली बळकट कास खरे॥
नमन करीतो साष्टांगे तुज, भवपाशातुनि काढी रे ! I
चरण न विसरे अहोरात्र मी, आण तुझी जगजेठी रे ! II
छळुनि पाहसी अंत किती हरि ! मिळेल कोठे थार रे ? ।
जवळि न घेता दूर लोटिसी,  अपराधी   मी   फार   रे ! ॥१॥
झणि कनवाळू म्हणती तुजला वेद-पुराणे-शास्त्रहि रे ! ।
येर कोणि नच म्हणती देवा ! समर्थ तुकया बोले रे ! ॥
चरचर फाडिन काळिज आता, भेटि ने मजला देसी रे !।।
ठकडा देवा ! कळला आता, हटयागे वश होसी रे ? ॥
डमरू धरूनिया हस्तकि भोळ्या ! महानंदाते फळसी रे !।
मीच तुझा का काळ?  म्हणोनी ढरपण घेउनि बससी रे i I
नम्र राहतो तव चरणी जो, चित्त पाहसी वाया रे i।
तनू फाटकी जीर्ण वस्त्र ते, नसे    सुदामा    खाया   रे ! ॥२॥
म्हणती धरथर काळ कापतो, नाम तुझे जे घेती रेi।
दर्शन घेता जन्म-मरणि ते पारच सत्वर होती  रे ! I
धर्म कराया नृप तो बसला, सरड्यापोटी गेला रे!।
नराचाहि नारायण करि तो, बळ संतांच्या बोला रे ! ।।
परमेश्वर तू भक्तकल्पद्रुम ! लोटांगण मी घाली रे i ।
फरफर ओढी अंती यम मज, दया न तुजला आली रे!।।
बरे पुरविसी वस्त्र धावुनी संकटि तू भक्तासी रे ! I
भला द्वैति मज कळला देवा ! ममस्थिती ही करिसी रे ! ।I३॥
मला वाटते, नावडता मी म्हणुनी आला रागे रे ! ।
तर का कमती देवा ! तुजला ? घेई माझा प्राण त्वरे ।।
रघुनाथा ! की जागा नाही स्वर्गी बा ! मजसाठी रे ! I
लौकर लौकर सावकार तो धन पृथ्वीतुन काढी रे ! ।I
वर्म कळाया पुण्य पाहिजे, मी तव दास अभागी रे ! ।
शरण आलिया मरण देसि का ? जहर तरी ते पाजी रे ! ॥४॥
शरणागत जे आले चरणी, उध्दरले ही कीर्ति भरे ।
सहजकृपेने मोक्षहि देसी, ऐसा तू श्रीराम हरे ! II
हरिणी संकटि धावुनि रक्षिसी,का धरिला अभिमान रे ! ।
बाळ तुझा मी,वध का करिसी ? कसा विरोध महान रे ! ॥
क्षमा मागतो देवा ! तुजला कमी जास्त मी वदलो रे ! ।
सुज्ञपणे तू तुकड्यादासा सहज   उध्दरी   जाणुनि   रे ! ॥५॥