रम्य असे परि उदास दिसतो, दिव्य शक्तिवाचुनी
(चाल : दयामयी अवतार..)
रम्य असे परि उदास दिसतो, दिव्य शक्तिवाचुनी ।
लोपला गेला याचा धनी ।।धृ०।।
शरीर सुंदर किती दिसो परि आत्मा नसता क्षणी ।
भावना रुसरुसती आतुनी ।।
तसेच झाले या दृश्याचे, काय बघावे अम्ही ?
भास हा धडधडतो मन्मनी ।।
कळला असता वेळकाळ जरि येतो हो त्या दिनी ।
जीव हा लहलहता मोहुनी ।।
(अंतरा) परि चिन्ह दिसेना बघता ही वादळे ।
या हवेत येइल पुण्यपुरुष ? नाकळे ।
आलाच तरि कुणी राक्षसची ये बळे ।
कोमलहृदयी, जनकल्याणी, नवस्फूर्तीचा धनी ।
बघाया जीव झुरे आतुनी ॥१॥
बघा तरी हे विशाल फक्तर, उंच टेकड्याहुनी ।
बांधले किल्ले चहुबाजुनी ।।
जिकडे तिकडे कडेकोट ही भव्य अती बांधणी ।
घेतला पन्हाळगड वेढुनी ।।
मुबलक पाणी झर्या-झर्यांचे जागजागि अडवुनि ।
बांधल्या विहिरी किल्ल्यांतुनी ।।
वृक्षलतांच्या सुंदर गुंफा, गुप्न मार्ग आतुनी ।
कळेना जाउ कुठे कोठुनी ॥
(अंतरा)थंडगार वायू झुळझुळतो साजिरा ।
जिव प्रसन्न होतो विसरुनि चिंता जरा ।
किती लांब दिसे ही भूमी अतिसुंदरा ।
अनेक रंगी सानथोर हे, पक्षी स्वर गुणगुणी ।
जिवाला पाडिताति मोहिनी ।।२।।
कड्याकड्याला बुरुज निर्मिले, गढ्यावरुनिही गढ्या ।
पडो ना म्हणुनि शत्रुच्या उड्या ॥
रैयत भवतालुनी वसविली, साह्य घ्यावया झणी ।
चालते किलबिल जनतेतुनी ।।
मधुनमधुन ह्या दऱ्या साजिऱ्या, शांतिकुटिर वाटती ।
वनचरे, पशु तपी राहती ।।
हा स्तुत्य उपक्रम कोणास्तव निर्मिला ?
उपभोग भोगण्या कोणा किती राहिला ?
चमकला वीर शिवछत्रपती या स्थला!
सत्य, न्याय, चारित्र्य, संस्कृती रक्षाया बहुजनी।
पुरुष हा आला स्वर्गाहुनी ॥३॥
चंद्र प्रगटला गगनावरती, ताऱ्यांना शोभवी।
तसे न दिसती तै वैभवी ॥
धर्मभ्रष्ट नच दिसो जगावर म्हणुनि करी पहरवी ।
शक्ति ही महापुरुष भूषवी ।
हाक मारता मावळियांच्या झुंडी झुंजारवी।
गर्जना-रव अंबर भेदवी ॥
(अंतर)अध्यात्मवृत्तिचे अधिष्ठान अंतरी।
विश्वास अलौकिक कुलस्वामिनीवरी।
भावना उठाया संत-वरद घे शिरी।
तुकड्याचा प्रिय राष्ट्रधर्म हा, सांभाळी धावुनी ।
पणाला प्राण रणी लावुनी ॥४॥