आपुले , आपुले ते म्हणावे आपुले ।
( चाल : बजादे , बजादे तेरी बन्सी . . )
आपुले , आपुले ते म्हणावे आपुले ।
प्रसंगी जे देती जीव - प्राण आपुले ॥धृ॥
धनाचे ; तनाचे आणि सत्तेचे पाहुणे ।
काही काळ - वेळ देती, जाती आपुले ॥१॥
स्त्रीहि तैसी पुत्र तैसे , नातेवाईकहि तैसे ।
संकटी. साथ देती , ते खरेचि आपुले ॥२॥
सत्य मार्गे नेऊनिया , जीव उन्नति पावला ।
तो म्हणावा मित्र आपुला , हे खरे हो आपुले ॥३॥
या जगी सर्वांसीहि प्रेम करणेची बरे ।
दास तुकड्या तो सांगे , निरखावे आपुले ! ॥४॥