घडी-घडी म्हणतो मी तुजला, करनं काही काम ।
(चालः बारबार तोहे क्या समझावे..)
घडी-घडी म्हणतो मी तुजला, करनं काही काम ।
कशासाठी बसला ऐसा! आळसा धरोनी! धाम ?
काम नाही तर श्रमदानाने दे दुसर्या आराम ।
बांध कुणाची तुटकी कुटिया, होउनिया निष्काम ।।धृ०।।
अभिमानाची लाज सोडुनी, बोल कुणाशी गोड ।
असली तसली वाईट आदत आजपासुनी सोड
शिक्षण घे आवडीने काही, पोटापुरते साध l
पापासाठी राबू नको, ही खूण गाठ घे बांध ।।घडी0 ।|१॥
साधी राहणी देवावाणी, खर्च करी ना वाव ।
वाचव पैसा धर्म कराया, करी आपुले नाव ।
अधिक सांगतो-चोरी जारी, करु नको कोठे ।
सांगे तुकड्यादास तरीच रे ! नाव तुझे मोठे ।।घडी0 ॥२॥