स्नेह तुझ्याशी बहू दिवसांचा , कासयास मी करी ?
( चाल : हरि भजनाची रुची जयाच्या . . )
स्नेह तुझ्याशी बहू दिवसांचा , कासयास मी करी ?
तुला हे सांगावे का हरी ?
अंतर्यामी घटाघटांच्या तूच सर्व ना करी ?
तुला हे सांगावे का हरी ? llधृ०॥
( अंतरा ) ही भक्ती तुझी करुनिया अम्ही वाढलो ।
जे भलेबुरे म्हणुनिया तुझे राहिलो ।
बिघडलो परी पुनरपी तुझे बोललो ।
काम क्रोध - मद - मस्ती चढता , विसरुनि होतो दुरी ।
तुला हे सांगावे का हरी ? ll१ll
( अंतरा ) हा दोष आमुचा नसे असे वाटते ।
जव नेत्र आंधळे , मन हे भांबावते ।
क्षण विचार करण्या विवेक नसतो तिथे ।
पुनः वेळ येताची रडणे , हृदय तमाशा करी ।
तुला हे सांगावे का हरी ? ।l२।।
( अंतरा ) तू सकल जगाचा असे नियंता खरा ।
तुज भटकावे वाटते काय लेकरा ।
मग अम्हीच चुकतो , पुनः बोलशी बरा ।
तुकड्यादासा नको अता हे , दूर - दूर पण तरी ।
तुला हे सांगावे का हरी ? ।।३।।