जनतेचे सर्वत्र विडंबन , जनार्दना तुज दिसते का ?

( चाल : हरिका नाम सुमर नर . . ) 
जनतेचे सर्वत्र विडंबन , जनार्दना तुज दिसते का ?
वेळ कसा करतोस , पिता - पुत्रासि असे कधि असते का ? llधृ०॥
बंधु म्हणोनि अम्हीच अपुले , नाश कराया उठलो ना । 
काळा पैसा घुसखोरींनी , या जीवनातुनि मिटलो ना ।। 
नीती नाही , प्रीती नाही , माणूसकीही नाही जरा । 
जो तो बावरल्या परि पैसा सत्ता घ्याया घेत छुरा ।। 
कसला देश नि भेष कशाचा , स्वातंत्र्याची गरज नसे । 
मिळेल तैसे पाप करावे , भरण्याला अपुलेच खिसे । । 
याहुनि खेळ पुरे हा असला , देवा तुजला रुचते   का ? ॥१॥ 
किती बघावी वाट , तुझा कुणी भक्तवीर वा संत निघे । 
जो निघतो तो नेभळाचि या विकृत स्वरुपासीच बघे ॥
उपदेशाची वाण नसे परि शक्ति त्यास तिळमात्र कुठे । 
जो तो ब्रह्मज्ञानचि सांगे गुरुडंबर हे टाळ - कुटे । । 
वीरांचे वीरत्व आपुली जात - पक्ष घेऊनि फिरे । 
गंड बंड हे धेड पाहनी , वाटे बुडबुडतात झरे ।। 
प्रवाह अविरत निस्पृहतेने देश पुढे न्यायास कुणी । 
नाही आता उरला वाटे अंतर्मुख चिंतिता मनी । । 
विनाश करण्यासाठिचं आता देव अम्हासी हसतो का ? ॥२॥
शिफारसीने विद्या येते नोकरी मिळते जातीने । 
गुणवानांची महाफजिती लपती जागिच भीतीने ।। 
असेल पैसा तोचि पुढे ये नाहि तरि त्या कोण पुसे । 
पाप कराया प्रवृत्त करणे सुधारणा तर हीच दिसे ।। 
असंख्य जनता भोळी अजुनी लुबाडण्याची हद झाली । 
आता तर अन्नान्न - दशेची वेळ उराशी ही आली । 
कुठे पळावे ! काय करावे । धडकी जिवाशी बसते ना ? ॥३॥
सरकाराशी विकार झाला अपुला पक्ष टिकवण्याचा । 
न्याय असो अन्याय असो त्या मोहचि नाही शिकवण्याचा ।। 
जो शिकतो , शिरजोरचि होतो अपुले घोडे दौडाया । 
चहबाजूनी ही बंडाळी , उठली देशा बुडवाया ।। 
क्रांतिवीर कधी प्रभू पाठवी डोळे अमुचे पाहताती । 
नाहीतर ही प्रलय पताका दिसते काळाचे हाती ।। 
तुकड्यादास म्हणे दिन दिन हा निसर्ग अंती रुसते का ? ll४॥