सदोष प्रकृति, दुर्गुण - मिश्रित, घेउनि तूज सामुरी ।
( चालः धन्य धन्य ये स्फुर्ति तन्मये . . )
सदोष प्रकृति, दुर्गुण - मिश्रित, घेउनि तूज सामुरी ।
कसा मी येऊ ! सांगना हरी ? llधृ०॥
मन हे खाते मनास माझ्या , काय दाखवू तुला ;
पाहसी मजकडं जंव विठ्ठला ।।
कितिक सावरु दोष आपुले , अगणित नाही सिमा ;
आवरी ना हे पुरुषोत्तमा !
( अंतरा ) तू बाह्य फूल - फळ घेउनि बघसी मला ।
हा समज मन्मनी होता मी घेतला ।
पण कळले अता ना आवडते हे तुला ।
सद्गुण प्रियकर ! सुनम्र सेवक , प्रसन्न तुजला करी ।
कसा मी येऊ ! सांगना हरी ? ।।१।।
कळले मजला - पुजा नको तुज , गंध - पुष्प चंदने ।
सुवासिक तेल , हार , ऊटने ।।
तुला हवे मन निर्मळ अमुचे , चरित्र - नीती बरी ।
प्रेम तव बसेल आम्हावरी ।।
नको अडंबर आसन - साधन , उगीच हे बाहेरी ।
तुज हवा नंदा - दिप अंतरी ।।
( अंतरा ) हे विश्व तुझे मंदीर जिते जागते ।
हे सान - थोर जिव दिसती तव भोवते ।
यांची शुश्रुषा पूजा तुज पावते ।
तुकड्यादास म्हणे - कळले तरी , वृत्ति न टिकते खरी ।
कसा मी येऊ ! सांगना हरी ? ॥२॥