कसे करु ध्यान , मन स्थिर जरा राहिना !
( चाल : कैदमें है बुलबुल . . . )
कसे करु ध्यान , मन स्थिर जरा राहिना !
विचारहि ऐकेना नि आचारहि साहिना ।।धृ।।
जरा नेत्र लावतो की , भूत - प्रेत भोवती ।
कोणि भिती दावती नि कोणि मना मोहिती ।।
सैन्य जसे उभे दिसे वासनेच्या संगती ।
कु - कर्माच्या केल्या सर्व पुढे येती पंगती ।।
घाबरली वाणि तरी दया तुज येईना !
विचारहि ऐकेना नि आचारहि साहिना ॥१॥
मूर्ति पुढे पाह तरी अंधारी ये सामुरी ।
साधनांची गती सर्व झाली आता बावरी ।।
लोक काही म्हणो माझी लाज मला नावरी ।
तटस्थता धरुनी तरी झोप ये अंगावरी ।।
तुकड्यादास म्हणे गुरुदेवा ! पाहि पाहिना ।।२।।