सर्व वस्तू जगामाजी, तुला पाहिजे ते काय ?

(चाल: ओ काली टोपीवाले तेरा...)
सर्व वस्तू जगामाजी, तुला पाहिजे ते काय ?
होशी कासयाने राजी, तुला पाहिजे ते काय ? ।|धृ०।।
रत्न - जडित हिरे मोती कुठे राहताती । 
पैशासाठी प्राण देण्या कुठे धावताती । । 
कोणी राहती अंदाजी , तुला पाहिजे ते   काय ? ll१।। 
कोणा भोग आवडतो रात्रंदिन सारा । 
कोणी त्याग भावनेने आवरी पसारा । । 
कोणी दोन्हीत नाराजी , तुला पाहिजे ते काय ? ।।२।। 
कोणी देव - भक्ती करी जिवा आलिंगुनी । 
कोणा नको देव - धर्म आणिक इमानी । । 
सांग कशाचा तू मौजी , तुला पाहिजे ते काय ? ll३ll
कोणी कीर्तिसाठी सेवा करी मनोभावे । 
कोणी अरेरावी करी , म्हणे - आम्हा गावे ।। 
म्हणे तुकड्यादास, तुला पाहिजे    ते   काय ? ll४॥ 
खोपडा , दि . १३ - १० - १९५९