करि जतन नरतनू प्राण्या ! ही योनी न मिळे शहाण्या ?
(चालः चल ऊठ भारता ! आता..)
करि जतन नरतनू प्राण्या ! ही योनी न मिळे शहाण्या ? ॥ धृ0॥
संचीत बहू हो ! तुमचे । नरजन्म
मिळाले साचे ।।
बहु पुण्य कमाई केली । ही रत्नतनू करि आली ।।
मिळवुनी अशी ही योनी ।
नित्यानित्य विचारी आणी ।
देहाभिमान त्यागोनी I
बांधि रे ! गाठ पुण्याची । हरिभजनी सत्वर नाची ॥१॥
संसार सदाचा आहे । परमार्थ न होई पाहे ।।
रेखा कर्माची वळली । ही संधि तुला आकळली ।।
अनमोल रत्न सापडले ।
सुकृत ते बहुतचि फळले ।
हरिनामी आता डोले I
शोधि शोधि रे ! श्रीगुरूला I जा सत्वर शरण तयाला ॥२॥
घे साधन करुनी आता । तोड़ि रे ! जन्म आकांता ॥
तो उभा विटे वनमाली । पाहतो वाट सुखशाली ।।
जरि धाडिसि योनी वाया ।
मग नाहि दया यमराया ।
घे आत्मज्ञानचि सखया !
बहू गोता चौऱ्यांशीचा । शास्त्रांची सत्यचि वाचा ॥३॥
वासुदेव भज रे ! आता । वश करी जगाचा त्राता ।।
नरतनू वाउगी गेली । तरि माय वृथा तुज व्याली ।।
स्मर मना ! अजुनि तरि देवा । जरि खाया पाहिजे मेवा ।।
धरि चरण गुरुचे आता ।
का पढतमूर्ख रे ! होता ?
तारिले पहा किती भक्ता ।
तुकड्या तो शरणचि गेला । ठाव सद्गुरुने दिधला ।।४॥