जाण स्वप्नसम जग हे सगळे, वेड्या !
(चाल: उठा गड्या ! अरुणोदय..)
जाण स्वप्नसम जग हे सगळे, वेड्या ! अजुनी का भ्रमसी ?
धरुनि सद्गुरु - चरण पार हो, शाश्वत घे रे ! तरण्यासी ॥धृ0॥
अवचित नरतनु तुला लाधली, वेळ ऐसि का गमवीसी ?
धोतरजोडा रेशिमकाठी अंती कोठे रे ! नेशी ? ॥१॥
सुंदर खासा महल तुजला, पाहुनिया तो का रमसी ?
नश्वर भव हा सारा प्राण्या ! थाट तू कवणा दाखविसी ? ॥२॥
अविनाशी तो अनंत ईश्वर, सदा असुनिया तुजपासी ।
तुकड्यादास नमुनिया बोले, स्वरुपी का नच रत होसी ? ॥३॥