ते विषयसुख तुला कसे गोड वाटे गा !
(चालः कशि फिरलि हरीची मर्जी...)
ते विषयसुख तुला कसे गोड वाटे गा !
साहे न मार काळाचा, पळसिल नंगा ।।धृ०॥
मारसी मायबापाला धरूनि हाते I
जमवील शिरावरि जोडे, न दया त्याते ।।
हो सावध आता तरी, सत्य पाही रे !
का शाश्वत सोडुनि अशाश्वता ध्यायी रे ! ।।१।।
जाहला भ्रष्ट जातीत, कर्म सोडोनी ।
धर गुरुचे चरणा अता, जासि निजस्थानी ।।
अंकित तो तुकड्यादास वदे सखया रे !
श्री आडकुजींच्या कृपेच तरतिल सारे ।।२॥