होई सावध रे मनुजा ! हरिची माया लटकी ।
(चालः कसा निभवसी काळ..)
होई सावध रे मनुजा ! हरिची माया लटकी ।
हिने किती नर आणिक नारी केल्या बहू अटकी ।।धृ०।।
ब्रह्मा मोहिला शंकर, सनकादिक, इंद्रहि भारी ।
भस्मासुर मोहिला पामरा ! तू कवण्या तीरी ?
योगी-भोगी-जोगी मोहिले, मोठे तपधारी ।
विद्वानहि पंडित मोहिले, भुलले सुधि सारी ।।१।।
पंच भुतांच्या विषयापासुन आकृति ही भारी ।
हिचे सपाट्यामधून झाले पार गड्या ! चारी ।।
शुक आणिक हनुमान , भीष्म , कार्तीक ब्रह्मचारी I
तुकड्या बोले गुरु - कृपेने नर होईल पारी ॥२॥