आलासि कोठुनी बरा, हेचि शोधी रे !

(चालः कार्तीक पौर्णिमा रम्य निशा..)
आलासि कोठुनी बरा, हेचि शोधी रे !
तुज कशी लाभली जन्माची संधी   रे ! ॥धु०॥
अघटीत कमाई केलि रत्न मिळण्याला ।
सोडुनिया सोहं शब्दचि कोहं धरिला ।।
खेळोनि गमविले बाळपणी वय सारे ।
भोगोनि विषय ते पात्र त्रासि झाला   रे ! ॥१॥
लागली तुला मग खेच, वृध्द तनु झाली ।
ओरडसी देवा ! दया न तुज का आली ? ।।
पावेल कसा तो हरी ? स्मरे न कधी रे !
तो तुकड्या रतला गुरु-चरणी आधी रे ! ।।२॥