सर्व साधनात धर्म श्रेष्ठ जाण बा !
(चाल: नामके अधार से कई लोग..)
सर्व साधनात धर्म श्रेष्ठ जाण बा !
करिल जो कि पुण्य सदा भाग्यवान बा ! ॥धृ०॥
मिळुनि रत्नयोनि तुला, व्यर्थ धाडसी ।
नाहि काय शरम जरा ? भक्त मान बा ! ।।१।।
काहितरी एक धरी, पूर्णपणे नेम करी ।
भरुनि सात रांजण, तरला अजाण बा ! ।।२॥
पाहि पाहि रे ! विचारि तूच ब्रह्म की ।
सद्गुरुसि माग माग, स्वरुप - दान बा ! ।।३॥
नाशवंत जाण रे ! जी वस्तु तुज दिसे ।
वाटतो आनंद परी स्वप्नभान बा ! ॥४॥
जव न मिटे द्वैत तुझे भ्रमित राहसी ।
करुनि संतसंग उघड स्वरुप - खाण बा ! ॥५॥
टाकुनि देहाभिमान, धरी श्रीहरी - चरण ।
दास तो तुकड्याहि शरण, लावि ध्यान बा ! ।।६।।