संतसंगाविना काही नसे मुक्ती तुला पाही

(चालः अगर है शौक मिलनेका..)
संतसंगाविना काही नसे मुक्ती तुला पाही ।।धृ०।।
पापपुण्ये करोनिया, लाभली नरतनू सखया !
मोहजाळी भ्रमवि माया, हरीचे  नाम   का   नाही  ? ॥१॥
अशाश्वत जाण माया ती, बहू फसले पुढे फसती ।
पहा हो  !  लक्ष पुरवोनी, कोण   देई   खरी    ग्वाही ।।२॥
करिसि जप-नेम-तप सारे, तीर्थयात्रा फिरोनिया ।
प्रभु वश जोवरी न केला,  भोगिसी    जन्ममरणाही  ॥३॥
अंध दृष्टी मिटे तेव्हा, करिसि सत्संगती जेव्हा ।
तो तुकड्यादास बुडलासे, करा हो  !  पार लवलाही ।।४॥