का करिसी शोक अता कर्म घेउनी ?
( चाल : मंगलमय नाम तुझे .. )
का करिसी शोक अता कर्म घेउनी ? ॥धृ0॥
होइ ते चुकेल काय ?
म्हणसि नरा ! हाय-हाय ।
व्यर्थ कष्टविली माय, मूर्ख होउनी ॥१॥
हरिश्चंद्र लोक - सखा I
कर्म-भोग चुकला का ?
देसि हाक व्यर्थचि का ? सोडि रे ! झणी ॥२॥
रावणादि थोर थोर ।
रामपदी होती चूर I
कर्मगती फार घोर, जाण रे ! मनी ॥३॥
सोडि कर्म-भ्रम आता ।
कर्तव्या धीर हाता I
तुकड्या म्हणे जगत्राता, येई धावुनी ॥४॥