असमर्थ जगी तो कोण ? ऐसा द्यावा निवडून

(चाल: चल ऊठ भारता ! आता .. )
असमर्थ जगी तो कोण  ?  ऐसा द्यावा निवडून ॥धृ०।।
कारण की शास्त्र प्रमाण । ना ठाव श्रीहरीवीण ॥
जरि असमर्थचि तो होता । तरि जन्मा कधि नच येता ।।
जरि समर्थ जीव म्हणावा ।
तरि का करि दुःख गोवा  ?
अपरोक्ष असुनिही ठावा ।
का परोक्ष ब्रह्मज्ञान ।  ते घेइ़   सद्गुरुवीण ? ॥१।।
घुंगट घेउनि मायेची ।  बहू दुःख जगी तो भोगी ।।
ना ठेविच दया कुणाची ।  का समर्थ म्हणता रोगी ?
तुकड्या म्हणे ऐका ऐका ।
हा सर्व भ्रांतिचा धोका ।
घ्या अध्यात्माचा झोका ।
अद्वैत सकळही जाण ।  मायेने गेले भुलुन ॥२॥