करी काहि कर्तव्य गड्या रे ! उध्दरण्यासाठी
(चाल: पतीतपावन नाम ऐकुनी..)
करी काहि कर्तव्य गड्या रे ! उध्दरण्यासाठी ।
धगधग धगधग तपे काळ हा, तुमच्या रे ! पाठी ॥धृo॥
प्रसन्न होउनि दिधली देवे शक्तियुक्ति सारी ।
हात - पाय - डोकेही सुंदर, मग का हो ! भिकारी ? ॥१॥
तुमचेसाठी करुनि बगीच्या ठेवियला देवे ।
पाणी टाकुनि फुल तोडावे, हेहि का न ठावे ? ॥२॥
कर्म - कर्म का ओरडता रे ! गुरुसी शरण रिघा ।
अजुनि तुम्हा का झोप लागली ! कर्मास्तव जागा ॥३॥
तुकडयादास म्हणे प्रभूचरणी हाकहि द्या ऐसी ।
बहू श्नमलो मी मायाजाळी, घ्या हो ! पदरासी ॥४॥