वदा रे ! नाम ते हरिचे, जरुर तुम्हास तरण्याची ।
(चालः अगर है शौक मिलने..)
वदा रे ! नाम ते हरिचे, जरुर तुम्हास तरण्याची ।
दंभ सोडूनिया सारे, नका करु आस देहाची ॥धृ0॥
पहा तो वाल्मिकी कोळी, उलट नामेचि हो ! तरला ।
गर्व धरिला विश्वामित्रे, धूळ झाली तपस्येची ॥१॥
दयाळू सद्गुरुराजा पूर्ण करि नेम लीनपणे ।
संतसेवा करा तुम्ही, धाव घ्या मोक्ष मिळण्याची ॥२॥
अशाश्वत देह हा जाणा , कधी न मिळे जिवी माना I
दास तुकडया म्हणे घ्या हो ! जोड गुरुदेव - चरणाची ॥३॥