हरीचे स्मरण करि मनुजा !

(चालः मनाला स्थीर करवाया..)
हरीचे स्मरण करि मनुजा !  जरुर तुजला रे ! तरण्याची ॥ धृ०॥
करी सचराचरी वसती उभारोनी पुरी जगती ।
तोचि परमेश्वरूं प्राण्या  !  पाहतो वाट भक्तांची ॥१॥
पहाया जाल जरि तुम्ही  दिसेना देवपण धामी ।
सदा भक्तीत नाचाया   धरावी   संगती   साची ॥२॥
करिसि पंचाग्नि हटयोग  न टळला कर्ममय भोग ।
मिळाल्या सद्गुरु पूर्ण फुटे रे  !  वाणि    प्रेमाची ॥३॥
भजे जो हरिहरा नित्य करुनि व्यवहारही सत्य ।
म्हणे तुकड्या तरे तोची आण गुरुराज-चरणाची ॥४॥