श्रीहरि - चरणी लीन राहुनी स्वहीत अपुले हरु नको

(चालः बिकट वाट वहिवाट नसावी..)
श्रीहरि - चरणी लीन राहुनी स्वहीत अपुले हरु नको ।
आधि विवेके प्रपंच करुनी भक्तिभाव तो विसरु नको
॥धृ०।।
सर्व जगामधि ब्रह्म एकची उणे कुणाला पाहु नको ।
आनंदे संसार करी पण परमार्थाविण राहू नको ॥
खोटे नाटे वेव्हार करुनी अपकीर्तीला मिळवु नको ।
काम - क्रोध - मदमत्सर मोहो यांचे नादी लागु  नको ॥१॥
साधुसंत-ऋषिमहंत यांचे चरण कधीही सोडू नको ।
देउनिया विश्वास कुणाला मग मागे बा ! फिरु नको ॥
परधन आणिक परकांतेवरि लक्ष कधीही ठेवु नको I
आले संकट किती जिवावर धैर्य कधीही  सोडु  नको ॥२॥
पुण्यकर्म करुनिया अंतरी पश्चातापा आणु नको ।
सर्व जगामधि मीच शहाणा शब्द असे हे जाणु नको ॥
तुकड्या बोले शरण आलिया मरण कदापी देऊ नको ।
सदगुरु चरणी शरण राहुनी स्वरुपाचा भ्रम ठेवु नको ॥३॥