चार दिवस जग पाहसि प्राण्या ! करि काही उपकार
(चालः दीनदयाळा राम ! कामा..)
चार दिवस जग पाहसि प्राण्या ! करि काही उपकार ॥धृ0॥
संतसमागम निशिदिनी करुनी नरतनु ही उध्दार ।
धर्मनीतिने राहूनिया क्षिती भोगी निज - सुखसार ॥१॥
गणगोतहि ते टाकु नको रे देई त्यासि आधार ।
सर्व घरी परमेश्वर नांदे भजने होशिल पार ॥२॥
सोडुनि देई द्वैतबुध्दि तू त्वंपद - तत्पद धार ।
स्वप्नासम जग जाण गड्या रे ! धरि तुकड्या निर्धार ॥३॥