वनी जावे ऐसे वाटे , तिळमात्र अता ना जिव कंठे
( चाल : सुख आले माझ्या दारी . . . . )
वनी जावे ऐसे वाटे, तिळमात्र अता ना जिव कंठे ।।धृ०॥
गमते न घरी या अन्य कुठे बाजारी ।
ओसाड दिसे ही सगळी मानव नगरी ।।
मन विटले बोचती काटे, तिळमात्र अता ना जिव कंठे ॥१॥
अंगास उटी भस्माची लावूनी जावे ।
कौपीन जुने कुणि वस्त्र मिळे नेसावे । ।
मन सात्विक हे उफराटे, तिळमात्र अता ना जिव कंठे ॥२॥ तुकड्यास गमे - प्रभु झडकरी येवो भेटो ।
वासना समुळ ही विषयापासुनी फाटो । ।
म्हणुनीच सदा जिव दाटे, तिळमात्र अता ना जिव कंठे ॥३॥
- घुडनखापा, दि . २२ - ०९ - १९५९