किती करु भक्ति, भक्ति सांगा विठ्ठलाची ।

( चाल : एकतारी गीत . . . ) 
किती करु भक्ति, भक्ति सांगा विठ्ठलाची । 
अजुनिया नाही , नाही झाली भेटी त्याची ॥धृ०॥ 
जीव उतावीळ वाट पाहता - पाहताची । 
आता नाही उरली   शक्ति ! । किती करु० ॥१॥ 
मन झाले वेडे , वेडेपिसे बावरले । 
भिरी - भिरी चोहीकडे , देवासची पाहु गेले ।। 
कोणीतरी     सांगा    युक्ति ।। किती करु ॥२॥ 
आता शेवटी हा कंठ , दाटूनीया आला । 
रोमांचले देह सारे , नेत्री पूर साठवला ।। 
तुकड्यासी घ्याया स्फूर्ति ।। किती करु० ॥३॥ 
                               - घुडनखापा, दि . २५ - ०९ - १९५९