ठेविला विश्वास म्हणोनी , पावलो प्रसाद मी
( चाल : कैदमे हे बुलबुल . . . )
ठेविला विश्वास म्हणोनी , पावलो प्रसाद मी ।
धरली तुझी कास म्हणोनी , झालो तुझा दास मी ।।धृ०॥
आता एक चित्त करोनी निवांत रहावे ।
सर्वव्यापी रूप तुझे घडो - घडी पहावे ।।
जे जे कोणी दिसे ते ते तूच - तू म्हणावे ।
मनोभावे जिवे - भावे नम्र सदा असावे ।।
काम क्रोध लोभ दंभ , ज्याची भुललो रास मी ।
धरली तुझी कास म्हणोनी , झालो तुझा दास मी ॥१॥
अपुले नि परके आता एकची जाहले ।
प्रभू - लेकरेची आम्ही अनुभवा पाहले ।।
सुख - दुःख उंच - नीच भेदभाव निमाले ।
जन्म - मरण सगळेची खेळ आम्हा जाहले ।।
तुकड्यादास म्हणे मागे होत असो उदास मी ।
धरली तुझी कास म्हणोनी , झालो तुझा दास मी ।।२।।
- घुडनखापा, दि. २०-०९-१९५९