कुणापासी सांगू जिवाची कहाणी ?
( चाल : कैद में है बुलबुल . . . )
कुणापासी सांगू जिवाची कहाणी ?
तुम्ही संतजन मना , शांतवाना कोणी ? ।।धृ।।
क्षण येत नाही भक्ति मनामाजी ,
विषयासी धाव घेई बनोनिया पाजी ।
स्वानासमान हा भटके मनाजी ,
नाक - कान - डोळे याची करी हांजी हांजी ,
सांगा कोण देई साथ अपुला म्हणोनी ?
करा करा दया कोणी , ऐका दीन वाणी ! ॥१॥
पेटला संसार हा उफाळली ज्वाला ,
आवरेना काम - क्रोध दाखवू कुणाला !
लोभ दगा देऊनी फसवी देहाला ,
मत्सराने जीवनाचा घात सारा केला ।
कुणीकडे पहावे अंधारामधुनी । ।
तुकड्यादास लीन सदा, सतगुरुचरणी ॥२॥
- घुडनखापा ( छिंदवाडा ) , दि . ०१ - ०९ - १९५९