राग नको मानु माझा , हीन - दीन दास मी
( चालः कैदमें है बुलबुल . . . )
राग नको मानु माझा , हीन - दीन दास मी ।
आलो तुझ्या पायी देवा ! धरुनिया आस मी । । धृ० ॥
काम - क्रोध - लोभ माझे अंगभरी राबती ।
स्वानापरी त्याने माझी मांडली अधोगति । ।
कोणी प्रेम करीना , कोणी ये ना संगाती ।
मार्गावरी पाहता मला तोंड फिरु पाहती । ।
सर्व विकारांनी झालो आजवरी नाश मी ।
आलो तुझ्या पायी देवा ! धरुनिया आस मी । । १ । ।
तन - मन - धन सर्व कलंकीत जाहले ।
माझे म्हणावया आता काहीच न राहिले ! !
धि:कारती गणगोत जाउनिया पाहिले ।
आता जीव द्यावा कोठे ? येवढेच राहिले । ।
शेवटची याद म्हणुनी टाकितो विश्वास मी ।
आलो तुझ्या पायी देवा ! धरूनिया आस मी ।।२।।
दाटतसे कंठ , फार बोलणेहि होइना ।
रोमांचले अंग एक क्षण स्थिर राहिना । ।
आली आठवण प्रभू तारतो हीनादीना ।
पश्चाताप तैसा मज सांगतो पुन्हा - पुन्हा ।।
तुकड्यादास म्हणे अंती धरली तुझी कास मी ।
आलो तुझ्या पायी देवा ! धरूनिया आस मी ॥३॥
- घुडनखापा , दि . २० - ०९ - १९५९